भारताच्या पोरी जगात भारी, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुरळा, मालिका 3-0 ने खिशात! #Cricket #sports #India

Bhairav Diwase
0

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने (IND W vs SA W) दक्षिण आफ्रिका महिला संघाचा धुरळा उडवला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने धुव्वा उडवला. अखेरच्या वनडे सामन्यात भारताने सहा विकेटने मात मारत मालिका खिशात घातली. स्मृती मंधाना हिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्मृतीने तीन सामन्यात दोन शतकं आणि एक अर्धशतक ठोकत सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला.


बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने (IND W vs SA W) दक्षिण आफ्रिका महिला संघाचा सहा विकेटने पराभव केला. आधी गोलंदाजांनी आफ्रिकेला रोखलं, त्यानंतर फलंदाजांनी आपली कामगीरी चोख बजावली. अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 215 धावांवर रोखले. दिप्ती शर्माने 10 षटकात 27 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेत आफ्रिकेला रोखलं. आफ्रिकेने दिलेले 216 धावांचे आव्हान टीम इंडियाने चार विकेटच्या मोबदल्यात 40.4 षटकात सहज पार केले. भारताकडून स्मृती मंधाना 90 धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 40 धावा जोडल्या.



दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. आफ्रिकेला 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात फक्त 115 धावांपर्यंतच मजल मारता आली. आफ्रिकेकडून पहिल्या विकेटची 102 धावांची भागिदारी झाली, पण त्यानंतर गोलंदाजांनी भेदक मारा करत सामन्यात कमबॅक केले. आफ्रिकाकडून कर्णधार लॉराने 57 चेंडूंत 7 चौकारांसह 61 धावांची खेळी केली. ताजमीनने लॉरासोबत शतकी भागीदारी रचली. ताजमीनने 38 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. श्रेयंका पाटील आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी एक गडी बाद केला.


आफ्रिकेने दिलेल्या 216 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी 61 धावांची भागिदारी केली. शेफाली वर्मा 25 धावा करून बाद झाली. शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर स्मृती मानधनाने वेगवान फलंदाजी सुरूच ठेवली. 83 चेंडूत 90 धावा करून स्मृती बाद झाली. स्मृती मंधानाला या मालिकेत तिसरे शतक झळकावण्याची संधी होती. पण ती थोडक्यात हुकली. स्मृती मंधानाशिवाय टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनेही शानदार फलंदाजी करत 48 चेंडूत 42 धावा जोडल्या. 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने 40.4 षटकात 4 गडी गमावून 220 धावा करत सामना सहज जिंकला आणि मालिका खिशात घातली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)