निवडून येताच खा. प्रतिभा धानोरकरांनी दिला आमदारकीचा राजीनामा; आता नवीन जबाबदारी #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज गुरुवारी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सुपूर्द केला. २०१९ ते २०२४ या कालावधीत जनसामान्यांची कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले.


अलिकडेच लोकसभा निवडणूक पार पडून त्यामध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदाची धुरा प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आली. खासदारपदी निवडून आल्याने आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल स्तुतीसुमने उधळली. याप्रसंगी प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत वेळोवेळी जनतेच्या प्रश्नांवर चर्चेसाठी संधी दिल्याबद्दल अध्यक्षांचे आभार मानले.

दिवंगत खासदार बाळू धानोरकर व मला विधानसभेचा कालावधी पूर्ण करता आला नाही, पण आम्हाला खासदार म्हणून जनतेने दिलेली संधी माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. या निवडणुकीत जनतेने भरभरुन दिलेले आशीर्वाद मी विकासकार्यात परावर्तीत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, मत देखील त्यांनी व्यक्त केले. भविष्यात देखील जनतेच्या कामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

मागील दहा वर्षांत बाळू धानोरकर व प्रतिभा धानोरकर या दोघांनाही आमदार म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. बाळू धानोरकर २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. मात्र आमदारकीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बाळू धानोरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आमदारकीचा राजीनामा दिला व लोकसभेची निवडणूक जिंकली. विशेष म्हणजे, बाळू धानोरकर यांना खासदार म्हणूनही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. पाच वर्षे पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना खासदार धानोरकर यांचे ३० मे रोजी निधन आले. दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही आमदारकीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. विशेष म्हणजे, धानोरकर २ लाख ६० हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. खासदार म्हणून निवडून आल्याने धानोरकर यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)