काँग्रेसमध्ये "पाल-थेरे" यांच्यात रंगला कलगीतुरा? #Chandrapur #pombhurna #Congress

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- आगामी होणार्‍या विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला समोर जाताना कार्यकर्त्यांची गरज आहे. कार्यकर्त्यांना निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा आहे. मात्र कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात न घेता तालुकाध्यक्षपदाची नियुक्ती केली, या मुद्यावरून पोंभुर्णा काँग्रेसमध्ये नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्ष वासुदेव पाल विरुध्द कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद थेरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या कॉंगेसच्या दोन निष्ठावंत कार्यकर्त्यांमधील हा वाद विकोपाला जाण्यापूर्वी यावर जिल्हाध्यक्षांनी मध्यस्थी करून तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा, ऐन निवडणूकीच्या तोंडावरच काँग्रेस दुभंगली जाण्याची भीती आहे. कॉंगेसचे पाल व थेरे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असून दोन्ही व्यक्तींनी पत्रकार परिषद घेतली.


विनोद थेरेसह कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंगेस जिल्हाध्यक्ष यांनी नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती रद्द करण्याची मागणी आम्ही प्रदेशाध्यक्ष, खासदार व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांची भेट घेऊन करणार आहोत. जर का हि मागणी येत्या 15 दिवसांत पुर्ण नाही झाली तर सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा पत्रकार परिषदेत दिला.

पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप

पोंभुर्णा तालुक्यातील पक्षाची सुत्रे सांभाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा कॉंगेस जिल्हाध्यक्षांनी वासुदेव पाल यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र पोंभुर्णा तालुक्यात नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांच्या निवडीची माहिती कळताच तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी पाल यांच्या निवडीचा कडाडून विरोध केला. यासंदर्भात आधी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद थेरे यांनी पत्रकार परिषद घेत नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांच्यावर आरोप केले. त्यांनतर लगेच दुसऱ्या दिवशी तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांनी पत्रकार परिषद घेत मी कॉंगेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे माझ्यावरचे आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत अशी माहिती दिली.

पालची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती, मात्र निवडीचा कडाडून विरोध

लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यात कमालीचा जोश निर्माण झाला. अशातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी वासुदेव पाल यांची पोंभुर्णा काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली. या निवडीची माहिती कळताच तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी पाल यांच्या निवडीचा कडाडून विरोध केला.


पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारचे संवाद न साधता परस्पर व्यक्ती विशेष म्हणून वासूदेव पाल यांची अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. याकरिता पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी कुठलीही चर्चा न करता परस्पर एकाच व्यक्तीच्या नावाने शिफारस अध्यक्ष पदाची करून जिल्हा अध्यक्षाने पोंभुर्णा तालुका अध्यक्षपदी वासूदेव पाल यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष यांचे आजपर्यंत काँग्रेस पक्षांसाठी कुठलेही योगदान नाही आणि त्यांची पार्श्वभूमी बघितली असता काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचा आदेश जुगारून पक्षाशी बंडखोरी करून निवडणूक लढवली व काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षात (भाजपा) आपले स्थान मिळवले. पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करून योग्य व सर्व समावेश काँग्रेस विचारसरणीचा तालुका अध्यक्ष देण्यात यावा अन्यथा संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण कार्यकर्ते व सर्व सेलचे पदाधिकारी तसेच ग्रामीण महिला सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार असा इशारा कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.


पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे तत्कालील अध्यक्ष रवि मरपल्लीवार यांनी ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे पद रिक्त असल्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमेटी अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी मुंबई, नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमेटी यांच्या मान्यतेने जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुभाष धोटे यांनी दिनांक २६/०६/२०२४ ला पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष पदावर वासुदेव गोपाळराव पाल यांना नियुक्ती पत्र देऊन 'तालुका अध्यक्ष' जाहिर केले. तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी पोंभूर्णा पदावर वासुदेव पाल यांचे नियुक्ती झाल्यानंतर काही असंतुष्ट लोकांनी दिनांक २७/०६/२०२४ ला पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याबाबत विश्वासात न घेता निवड प्रक्रिया केल्याबाबत निराधार आरोप केले. त्यांनी केलेले आरोप निराधार व बिनबुडाचे असून पक्षनिष्ठेच्या विपरीत आहेत. निवडप्रक्रिया ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आली असून पक्षाचे निरंतर व अनुभवाचा पक्ष बांधणीत फायदा होण्याच्या दृष्टीने निवड केली आहे. काही असंतुष्ट व काही "बोलविता धन्याच्या" इशाऱ्यावरुन निराधारतेचे आरोप करुन पक्षाला व संघटनेला बदनाम करण्याचा षडयंत्र आहे.

येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्हाध्यक्ष या रंगलेल्या कलगीतुऱ्यात हस्तक्षेप करून नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्षाची नियुक्ती रद्द करतात कि कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामे घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. येणाऱ्या काळात पोंभुर्णा तालुक्यात कॉंगेसचे दोन चुली तयार होणार का? दुसरा गट तयार करून आपली वेगळी चुल मांडणार का? दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का? कोणत्या एका नेत्यांचे पंख झाटले जाणार? असे अनेक प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात कळेल. मात्र पोंभुर्णा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्याचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)