Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली; तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा

Bhairav Diwase
0
मुंबई:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी एका युट्युब चॅनलने दिली. सोशल मीडियावर ही बातमी अक्षरश: वाऱ्यासारखी पसरली. यामुळे संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, बातमी नजरेस पडताच जरांगे यांच्या समर्थकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी लेखी तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनोज जरांगे यांना काहीही झालं नसून ते सुरक्षित आहेत, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अफवांना अक्षरश: ऊत आला आहे.

समाजकंटकांकडून सोशल मीडियावर वारंवार अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांचं समर्थन करू नये, असं आवाहन पोलिसांकडून केलं जातंय.

तसेच कोणत्याही बातमीची पडताळणी केल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवू नये, असंही पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, तरी देखील काही समाजकंटक खोट्या बातम्या पसरवत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी एका युट्युब चॅनलवरुन पसरवण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. न्यूज विथ कोमल असं खोटी बातमी देणाऱ्या युट्युबरचं नाव आहे. सध्या सायबर पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)