Sudhir mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले काँग्रेसच्या खोट्या प्रचारावर मात करून मोदीजींचा विजयी शंखनाद! #Chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- मोदीजी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी पाकिस्तानमध्ये लोक प्रार्थना करत होते. भारतातही काही लोक मुस्लीम, आदिवासी बांधवांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. काँग्रेसने खोट्या प्रचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. याच खोट्या प्रचाराच्या आधारावर काँग्रेसने देशात काही जागा जिंकल्या. पण काँग्रेसच्या गेल्या तीन निवडणुकांची बेरीजही २४० होत नाही. उलट जनतेने पुन्हा एकदा देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील भाजप आणि मित्र पक्षांना पूर्ण बहुमत दिले. मोदी सरकारचा हा विजयी शंखनाद देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या सलग तिसऱ्या विजयानिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, भाजप नेते शिवचंद द्विवेदी, काशीनाथ सिंह, रणंजय सिंग, शिवसेना नेते कमलेश शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राकेश सोमाणी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस विद्याताई देवाळकर, महिला अध्यक्ष वैशालीताई जोशी, बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल वाघ यांच्यासह नीलेश खरबडे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, प्रदेश सदस्य रेणुकाताई दुधे, आशीष देवतळे, राजूभाई दारी यांची प्रमुख उपस्थिती होती.


‘देशातील जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने जननायक मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ७.१२ मिनिटांनी पंतप्रधान मोदीजी राष्ट्रपती भवनात शपथ घेण्यासाठी पुढे जात होते तेव्हा मला ताडोबातील वाघाची आठवण आली. एखाद्या वाघाप्रमाणे ते भासत होते. आणि हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मला लाभले,’ अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले, ‘सरकार स्थापन झाल्याबरोबर सर्वांत पहिले आणखी ३ कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतला. तिकडे काँग्रेसने प्रचारात महिलांना ८ हजार ५०० रुपये खटाखट देण्याच्या घोषणा करून महिलांची फसवणुक केली. काही राज्यांमध्ये काँग्रेसने गॅरंटी कार्ड दिले. सरकार आले नाही तरी, आमचा खासदार निवडून आला तर आम्ही पैसे देऊ असे त्यात म्हटले. आता उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जिथे काँग्रेसचे खासदार आले तिथे महिला फॉर्म ( गॅरंटी गार्ड )घेऊन पोहोचत आहेत आणि काँग्रेस नेते गायब आहेत. काँग्रेसचा हा खोटा चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या पुढे आला'.भाजप सत्तेचे नाही सेवेचे राजकारण करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा बल्लारपूरच्या जनतेने मला विधानसभेत पाठवले मी सेवेचा उद्देश ठेवला. कधी जात-पात-धर्म बघितला नाही. मदतीसाठी कुणी आला तर त्याचे काम बघितले. आताही नव्या ऊर्जेने कामाला लागणार आहे. गरिबांसाठी घरे, मालकी हक्काचे पट्टे अशा अनेक अपूर्ण विकासकामांना पूर्ण करणार आहे, असा निर्धारही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

‘त्या’ मतदारांचे खूप खूप आभार

ज्या ४ लाख ५६ हजार मतदारांनी जातीचे राजकारण, आरक्षणाच्या अफवांकडे दुर्लक्ष करून मला मतदान केले त्यांचे मी आभार मानतो. महायुतीच्याही सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. कारण आपण एक कुटुंब होऊन लढलो आहोत, अशा भावनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

आरोग्य सुविधा केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन

विजयी उत्सव सभेपूर्वी बल्लारपूर शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्ड येथे नागरी आरोग्य सुविधा केंद्र इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचे ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे काम जिल्हा स्तरावरील नगरोत्थान योजनेतून २२ लक्ष रुपये खर्चातून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच बल्लारपूर नगरपरिषद अग्निशमन विभागाला जिल्हा अग्निशमन योजनेतून मिळालेल्या अग्निशमन वाहनाचेही यावेळी लोकार्पण झाले. हे वाहन अरुंद गल्लीबोळातून जाण्यास सक्षम असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी उपयुक्त ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)